www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झिम्बाब्वे दौ-यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये युवा चेह-यांना स्थान मिळालं आहे. तर विराट कोहलीकडे कॅप्टन्सी कायम ठेवण्यात आली आहे. या दौ-यासाठी सिनियर्सना विश्रांती देण्यात आली आहे.
झिम्बाब्वेला जाणा-या भारतीय संघात काश्मीरच्या परवेझ रसूल आणि मोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त महेंद्रसिंग धोनी या दौऱ्यावर जाऊ शकत नसल्यानं कर्णधारपदाची सूत्रं विराट कोहलीकडे देण्यात आली आहेत. टीम इंडियात पुनरागमन करण्याचं गौतम गंभीरचं स्वप्न पुन्हा अधुरंच राहिलंय.
येत्या २४ जुलैपासून टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून ते तिथे पाच वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा संदीप पाटील यांच्या निवड समितीनं केली. आयपीएल स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विंडीजमधील तिरंगी मालिकेमध्ये सातत्यानं खेळणाऱ्या काही खेळाडूंना या दौऱ्यातून विश्रांती दिली जाईल, असा अंदाज होता आणि तसंच झालं. ईशांत शर्मा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या चौघांना निवड समितीनं विश्रांती दिली आहे, तर मुरली विजयला संघातून वगळण्यात आलंय.
या सिनिअर्स ऐवजी परवेझ रसूल, मोहित शर्मासाठी टीम इंडियाची दारं उघडण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, जयदेव उनाडकटचं भाग्य फळफळलं असून अजिंक्य रहाणेला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
झिम्बाब्वे दौ-यावर जाणारी टीम इंडियाः
विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, विनयकुमार, जयदेव उनाडकट, मोहित शर्मास चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, अमित मिश्रा, परवेझ रसूल, शमी अहमद.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.