www.24taas.com, झी मीडिया, कराची
क्रिकेट प्रेमीसाठी खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. कारण भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. पाकिस्तानविरुद्ध 2015 ते 2023 दरम्यान क्रिकेट खेळण्यास सहमती दर्शविली आहे.
पाकविरुद्ध सहा क्रिकेट मालिका खेळण्यास भारताने सहमती दर्शविली आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेट मालिका बंद आहेत. त्यानंतर आता पुन्हा नव्याने या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या देशांमध्ये मालिका होणार आहेत.
यापूर्वी या दोन देशांमध्ये 2012 मध्ये तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका झाली होती. त्यानंतर या दोन्ही संघांची गाठ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच पडली आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभन अहमद यांनी सहा क्रिकेच मालिकेबाबत ही माहीती दिली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) करार करण्यात आला आहे. यातील पहिली मालिका पुढीलवर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. या मालिकेत दोन कसोटी, तीन एकदिवसीय व दोन ट्वेंटी-20 सामन्यांचा समावेश असणार आहे. या सहा मालिकांमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 14 कसोटी, 30 एकदिवसीय व 12 ट्वेंटी-20 खेळणार आहेत, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.