www.24taas.com,नवी दिल्ली
पाकिस्तानने भारताविरोधात कारवाई करण्याचे थांबविले नसतानाही चॅम्पियन्स लीग टी-२० साठी भारतात येणाऱ्या पाक संघाला केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा मंजूर केला आहे. यामुळे १७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत आता पाक संघही सहभागी होऊ शकणार आहे.
यापूर्वी भारताने पाक संघाला व्हिसा नाकारला होता. १७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोंबर याकालावधीत भारतात चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेत पाकमधील फैसलाबाद व्हॉल्व्स हा संघ सहभागी होणार होता.
मिसबाह उल हककडे या संघाची धुरा होती. काही दिवसांपूर्वी या संघाने भारताकडे व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र नियंत्रण रेषेवरील तणावामुळे संघाच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्रालयाने संघाला व्हिसा नाकारला होता.
भारत सरकारच्या या निर्णयाचे विविध स्तरातून कौतुक झाले होते. तर भारताच्या या कृतीवर पाक क्रिकेटरनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, आता भारताने पाकसमोर पायघड्या टाकून त्या देशाने केलेल्या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना सामान्य नागरिकांनी बोलून दाखवली.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांनी पाक संघाला व्हिसा मंजूर केल्याचे स्पष्ट केले. लवकरच पाक संघाच्या खेळाडूंना व्हिसा आणि पासपोर्ट दिला जाईल असे या अधिका-याचे म्हणणे आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.