www.24taas.com, लंडन
कोलकाता कसोटीमध्ये पानिपत झालेल्या भारतीय संघातील खेळाडुंच्या कौशल्याबद्दल आणि क्षमतेबद्दल भारताचा माजी कसोटीवीर राहुल द्रविडने टीम इंडियातील खेळाडूंचे वाभाडे काढले आहे.
आयपीएलच्या पैशामुळे कसोटी क्रिकेटचा ऱ्हास होत असल्याचे बोलले जाते पण खेळातील पैसा कारणीभूत नसून भारतीय खेळाडूंकडे स्किल आणि क्षमतेची कमतरता असल्याचेही टीका राहुल द्रविड याने केली आहे. आपल्या स्थानिक पातळीवरील स्पर्धांमधून गुणवान खेळाडू तयार होत नाहीत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकतील अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.
दोन सलग कसोटी सामने गमावल्यामुळे भारतीय क्रिकेटचे रसिक भारतीय खेळाडूंवर नाराज आहेत आणि ते योग्यच असल्याची भावना द्रविडनेही व्यक्त केली आहे.
हरल्याचं दु:ख असतंच, परंतु भारत ज्या प्रकारे हरला त्याचं दु:ख जास्त असल्याचं तो म्हणाला. तीनही सामन्यांमध्ये भारत जिंकला, विकेट भारतीय खेळाडुंच्या पथ्यावर पडणारी होती आणि असे असूनही भारतीय खेळाडू त्याचा फायदा उठवू शकले नाहीत ही क्लेषकारक गोष्ट असल्याचे द्रविड म्हणाला.
नागपूरमध्ये विजय मिळवून भारतीय संघ मालिका अनिर्णित राखेल असा विश्वास त्यानं व्यक्त केला असून त्याकडे न बघता दीर्घदृष्टीचा विचार करून संघ घडवावा लागेल असा सल्ला द्रविडनं दिला आहे.