www.24taas.com, दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरूद्ध दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर सुरू असलेली सीरिजमधील चौथी टेस्ट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकरता भारतातील अखेरची टेस्ट ठरू शकते, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरही दिल्लीला पोहोचला आहे. अजितच्या उपस्थितीने सचिनच्या रिटायरमेंट्च्या चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अजित तेंडुलकर टेस्ट संपेपर्यंत दिल्लीतच राहणार आहे. आज दिल्ली टेस्टमध्ये सचिन तेंडुलकर बॅटिंगला येण्याची संधी आहे.
पुढील १५ महिने भारतात कोणतीही टेस्ट सीरिज नाही. थेट ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि तेव्हाच या दोन संघांमध्ये कसोटी मालिका रंगेल. परंतू, ऑक्टोबर २०१४ मध्ये सचिन ४१ वर्षं ५ महिन्यांचा असेल. तोवर तो कसोटी क्रिकेट खेळेल का? याबद्दल शंकाच आहे. टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यात संघाची आणि स्वतः सचिनची कामगिरी कशी होते, यावरच त्याचं संघात असणं किंवा नसणं अवलंबून आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की दिल्ली टेस्ट ही सचिन घरातल्या मैदानावर टेस्ट करिअरमधी शेवटची टेस्ट खेळेल.