`डर्टी` विद्याचा सल्लूला नकार...

विद्याच्या वेगळेपणानं सलमान खानलाही आकर्षित केलंय. त्यामुळेच आपल्यासोबत काम करण्यासाठी त्यानं विद्याकडे विचारणा केल्याचं समजतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 7, 2012, 09:47 AM IST

www.24taas.com, मुंबई
गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये भल्याभल्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे विद्या बालन... अभिनेत्रींच्या गर्दीमध्ये आपली खास अशी ओळख निर्माण करण्यात विद्या चांगलीच यशस्वी झालीय. तिच्या वाढत्या लोकप्रियतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता सलमान खानलाही विद्यासोबत काम करावसं वाटतंय.
लागोपाठ हिट चित्रपट देणारी विद्या आपल्या समकालीन अभिनेत्रींपेक्षा थोडी हटकेच आहे. ‘डर्टी पिक्चर’नंतर तर बॉलिवूडमधली ‘चौथी खान’ म्हणूनही विद्याकडे पाहिलं जातंय. विद्याच्या याच वेगळेपणानं सलमान खानलाही आकर्षित केलंय. त्यामुळेच आपल्यासोबत काम करण्यासाठी त्यानं विद्याकडे विचारणा केल्याचं समजतंय.
पण, सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खाननं विचारणा केल्यानंतरही विद्यानं त्याला सिनेमासाठी चक्क नकार दिलाय. कारण सलमानसोबत काम करताना विद्याला फक्त ‘ग्लॅमर बाहुली’ म्हणून काम करायचं नाहीय.
एका सूत्राच्या म्हणण्यानुसार, साजिद नाडियावालाच्या ‘किक’ या सिनेमासाठी सलमाननं विद्याकडे विचारणा केली होती. पण, विद्याला तिच्या भूमिकेत आणखी दमदारपणा हवाय. सलमान खान अजून या फिल्मबद्दल जास्त काही बोलण्यास तयार नाही. यासंबंधी विद्याच्या प्रवक्त्यासी संपर्क साधला असता त्यांनीही काही माहिती देण्यास नकार दिलाय.