मूर्तिमंत अ ‘स्मिता’ची आज जयंती!

आज १७ ऑक्टोबर...भारतीय सिनेसृष्टीत आपल्या कसदार अभिनयातून ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिचा आज जन्म दिवस… चित्रपटसृष्टीत तिने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना, सुक्ष्म बारकाव्यांसह प्रभावीपणे साकारल्या आणि त्यामुळंच रुपेरी पडद्यावरची सौंदर्याची रुढ संकल्पना तिच्या अभिनयासमोर दुय्यम ठरली..

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 17, 2013, 09:32 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आज १७ ऑक्टोबर...भारतीय सिनेसृष्टीत आपल्या कसदार अभिनयातून ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिचा आज जन्म दिवस… चित्रपटसृष्टीत तिने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना, सुक्ष्म बारकाव्यांसह प्रभावीपणे साकारल्या आणि त्यामुळंच रुपेरी पडद्यावरची सौंदर्याची रुढ संकल्पना तिच्या अभिनयासमोर दुय्यम ठरली..
रुपेरी पडद्यावर धारदार अभिनयातून भारतीय स्त्रीची सक्षम प्रतिमा साकारणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील... आपल्या कसदार अभिनयानं तिनं हिंदी सिनसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं होतं. दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून तिनं करिअरला सुरुवात केली आणि अभिनयात वेगळी उंची गाठली. मराठी तसंच हिंदी चित्रपटांतून स्मितानं विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना सुक्ष्म बारकाव्यांसह अभिनयातून साकारल्या आणि त्यामुळंच तिच्या सशक्त अभिनयापुढं रुपेरी पडद्यावरची सौंदर्याची रुढ संकल्पना दुय्यम ठरली. तिनं आपल्या अभिनयातून कधी प्रेक्षकांना रडवलं, हसवलं, तर कधी विचार करायला भाग पाडलं.
तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून झाली. त्यांनी तिच्यातली गुणवत्ता हेरली आणि रुपेरी पडद्यावर पहिली संधी ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर’ या सिनेमांमधून दिली. शाम बेनेगल यांच्या मंथन या सिनेमातूनच तिनं हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. मंथन आणि भूमिका या दोन्ही सिनेमातील तिच्या भूमिका गाजल्या.

स्मिता समाजवादी कुटुंबातली असल्यामुळं तिला सामाजिक प्रश्नांची जाण होती. त्याचं प्रतिबिंब तिच्या अभिनयातही उमटलं. मिर्च मसाला, अर्थ, उंबरठा या सिनेमांमध्ये तिनं साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायमच्या लक्षात राहिल्या. स्मितानं दलित, शोषित, बंडखोर स्त्रियांच्या भूमिका परिणामकारकपणे साकारल्या. समांतर सिनेमाबरोबरच व्यावसायिक चित्रपटही तिनं केले. शक्ती, नकम हलाल हे स्मिताचे चित्रपट सुपरहिट ठरले. स्मितानं आपल्या अभिनयानं दोन दशकं गाजवली.

राज बब्बरबरोबरचा तिचा संसार आणि तिची कारकीर्द स्मिताच्या अकाली जाण्यामुळं अपूर्ण राहिली. पण या काळात तिनं जे चित्रपट केले ते सिनेरसिक कधीच विसरु शकणार नाहीत. विलक्षण अभिनय, सुंदर डोळे, अतिशय हुशार आणि समाजिकतेचं भान जपणारी स्मिता नव्या पिढीसाठी आदर्श देवून गेली. त्यामुळंच भारतीय चित्रपटसृष्टीतली सर्वोत्तम अभिनेत्री कोण असा प्रश्न उपस्थित केला जातो, तेव्हा स्मिताचा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.