www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सुपर स्टार शाहरुख खानला त्याच्या तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला पेशावरला घेवून जायची इच्छा आहे. कारण त्याच्या कुटुंबाचा संबंध पेशावर शहराशी आहे.
एका वृत्त वाहिनीच्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झालेल्या शाहरुखनं पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी दिलेलं पाकिस्तानात यायचं आमंत्रण स्वीकारलं. शाहरुख म्हणाला, “मी लहान असतांना माझे वडील मला तिकडे घेऊन गेले होते, तिथं जायला मला आवडेल.”
किंग खान म्हणतो, “माझं मुळ कुटुंब पेशावरचं आहे आताही काही नातेवाईक तिथंच राहतात. मला पेशावरला जायला आवडेल विशेष म्हणजे मुलांना घेऊन, कारण मी १५ वर्षांचा असतांना माझे वडीलही मला तिथं घेऊन गेले होते, त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यावेळच्या आठवणी आजही माझ्या मनात आहेत. मी जेवढा काळ वडीलांसोबत पेशावर, कराची आणि लाहोरमध्ये होतो. त्या वडीलांच्या आठवणी कायम माझ्या सोबत आहेत. माझी मनापासून इच्छा आहे की एकदा माझ्या मुलांनाही तिकडे घेऊन जावं.”
शाहरुख खानचा जन्म भारतात झाला असला तरी त्याचे वडील ताज मोहम्मद खान यांचा जन्म पेशावरमध्ये झाला होता. ते त्यांच्या काळातले सर्वात तरुण स्वातंत्र्य सैनिक होते.
दोन्ही देशांमधला तणाव कमी झाला पाहिजे, दोन्ही देश मित्र व्हायला हवे, असं शाहरुख म्हणतो. ४८ वर्षीय शाहरुख नुकताच तिसऱ्या मुलाचा बाप झालाय. अबरामचा जन्म सरोगसीद्वारे झालाय. शाहरुख सांगतो, “अबरामच्या गालावरही त्याच्याचसारखी खळी पडते. आम्ही तिसऱ्या मुलाचा विचार केला कारण गौरी आणि मला मुलांच्या लहानपणीच्या आठवणी येत होत्या... आता माझा मुलगा १६ तर मुलगी १३ वर्षांची झालीय. ते दोघंही आपल्या मित्रांबरोबर बिझी असतात. त्यामुळंच आम्ही तिसऱ्या मुलाचा विचार केला”.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.