www.24taas.com,झी मीडीया, मुंबई
ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर फिल्म झळकवण्याची प्रथा आता किंग खाननेही सुरू केलीये. ईदच्या मुहूर्तावर किंग खान चेन्नई एक्स्प्रेस घेऊन बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. सलमानप्रमाणे त्यालाही ईदचा मुहूर्त लकी ठरणार काय, याकडेच आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात.
बॉलिवूडचा किंग खान त्याचा स्पेशल खासमखास ड्रिम प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यासाठी त्याने ईदचा मुहूर्त साधलाय. बॉलिवूडचा हा किंग खान आपली चेन्नई एक्स्प्रेस बॉक्स ऑफिसवर सुसाट धावावी, म्हणून गेले काही दिवस जोरदार आटापिटा करतोय. ऐन ईदच्या मुहूर्तावर फिल्म बॉक्स ऑफिसवर दाखल करण्याची प्रथा तशी बॉलिवूडसाठी नवीन नाही. सलमान खानला हा फंडा सर्वाधिक लकी ठरला.
सलमानने 2009 पासून ते 2012 पर्यंत जणू ईदचा मुहूर्त खास आपल्या सिनेमासाठी राखूनच ठेवला होता. 2009 मध्ये सलमानने ईदच्या मुहूर्तावर पहिल्यांदा वॉन्डेड झळकवला. त्यानंतर पुढच्याच वर्षी आला तो दबंग...दबंगला बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर यश मिळालं. एवढंच नाही, तर बॉलिवूडचा दबंग अशी ओळखही याच सिनेमाने सलमानला मिळवून दिली. त्यानंतर 2011 मध्ये बॉडिगार्ड आणि 2012 मध्ये एक था टायगर सलमानने ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित केले.
या सर्वच सिनेमांना चांगल यशही मिळालं. तेव्हापासून ईदचा मुहूर्त सलमानसाठी चांगलाच लकी ठरू लागलाय. अर्थात याच मुहूर्तावर झळकलेले सर्वच सिनेमे हिट ठरलेत असे नाही. कल हो ना हो, वीर-जारा, जानेमन, किडनॅप अशा काही फिल्म्स याच मुहूर्तावर दाखल होऊनही फ्लॉप ठरल्यात.
मात्र सलमानसाठी लकी ठरलेला हा हिट फिल्मचा फंडा शाहरुखला पक्का आवडलाय. म्हणूनच किंग खानने आपली चेन्नई एक्स्प्रेस जोराने दौडावी म्हणून ईदचा मुहूर्त साधलाय. आता प्रेक्षक या चेन्नई एक्स्प्रेसला कशी पसंती देतात आणि शाहरुखला ईदचा हा मुहूर्त सलमानप्रमाणेच लकी ठरतोय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.