दरोडेखोरांना कंगनासोबत काढायचे होते फोटो....

अभिनेत्री कंगना राणावत सध्या चंबळच्या खो-यात "रिव्हॉल्वर राणी` या सिनेमाचं शूटिंग करतेय. पोलिसांनी त्यांना सायंकाळी पाचपर्यंत शूटिंग संपवून रोज ग्वाल्हेरला परतण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Updated: Apr 17, 2013, 08:12 AM IST

www.24taas.com, चंबळ
अभिनेत्री कंगना राणावत सध्या चंबळच्या खो-यात "रिव्हॉल्वर राणी` या सिनेमाचं शूटिंग करतेय. पोलिसांनी त्यांना सायंकाळी पाचपर्यंत शूटिंग संपवून रोज ग्वाल्हेरला परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या युनिटची गाडी काही दरोडेखोरांनी अडविली. 10-15 जणांनी कंगनाच्या गाडीला घेराव घातला. तिच्या सोबत फोटो काढण्याची दरोडेखोरांची इच्छा होती. युनिटसोबत दिग्दर्शक साई कबीर हे देखील होता.

कबीर यांनी सांगितले की, `मी या परिसरात पंधरा वर्षे राहिलो आहे. त्यामुळे अशी परिस्थिती ओढवल्यास त्याला कशाप्रकारे सामोरे जायचे हे मला ठाऊक होते.` साई कबीर यांनी सांगितले की, ``मी दरोडेखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमच्यात वादही झाला.
दरोडेखोरांची भेट कंगनाबरोबर होऊ दिली नाही. कंगनासोबत पोलीस व्हॅन होती आणि कॉन्सेटबलकडे मशीन गनसुद्धा होती. त्यामुळे दरोडेखोर काही करु शकले नाहीत.