रितेश देशमुखला शंभर रुपयांचा दंड

अभिनेता रितेश देशमुख याला सातारा पोलिसांनी १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. आपल्या बीएमडब्ल्यू गाडीच्या काचांना काळी फिल्म लावल्याबद्दल हा दंड त्याला ठोठावण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 16, 2013, 03:54 PM IST

www.24taas.com, सातारा
अभिनेता रितेश देशमुख याला सातारा पोलिसांनी १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. आपल्या बीएमडब्ल्यू गाडीच्या काचांना काळी फिल्म लावल्याबद्दल हा दंड त्याला ठोठावण्यात आला.
नवी दिल्ली येथे बसमध्ये झालेल्या सामूहक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर सर्व गाड्यांच्या काचांना लावलेल्या काळ्या फिल्म्स काढून टाकण्याचा नियम बनवण्यात आला आहे. मात्र रितेश देशमुखच्या कारला काळ्या फिल्म्स लावलेल्या होत्या. सातरा जवळील कास पठार भागात रितेश देशमुखच्या सिनेमाचं शुटिंग चालू होतं. यावेळी त्याला भेटण्यासाठी ‘इंडियन व्हिजन २०२०’ चे सदस्य पंकज कुंभार आले होते. त्यांनी गाडीच्या काळ्या काचा पाहून रितेशच्या ड्रायव्हरला यासंबंधी विचारलं. त्यावर ड्रायव्हरने आरेरावीची भाषा करत “आम्ही या काचा लावून देशभर फिरतो, पण आम्हाला कुणी आडवू शकत नाही” असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून कुंभार यांनी साताऱ्यातील पोलीस अधिक्षकांना माहिती दिली.

रात्री सातारा पोलिसांनी यासंदर्भात रितेश देशमुखला दंड ठोठावला. रितेश देशमुखने आपली चूक मान्य करत शंभर रुपये दंड भरला आणि गाडीला लावलेल्या दोन लाख रुपयांच्या फिल्म्स काढून टाकल्या.