हरमायनी इंटरनेटवरील `डेंजरस सेलिब्रेटी`

हॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन म्हणजेच हॅरी पॉटर सिरीजमधील हरमायनी इंटरनेट विश्वात `मोस्ट डेंजरस सेलिब्रिटी` ठरली आहे. तिचे नाव सर्च करणेही आता धोकादायक बनले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 10, 2012, 07:21 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
हॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन म्हणजेच हॅरी पॉटर सिरीजमधील हरमायनी इंटरनेट विश्वात `मोस्ट डेंजरस सेलिब्रिटी` ठरली आहे. तिचे नाव सर्च करणेही आता धोकादायक बनले आहे. कारण सर्च करणाऱ्याच्या कम्प्युटरमध्ये मॅलिशियस सॉफ्टवेअर डाऊनलोड होतात. त्यामुळे कम्प्युटरमध्ये व्हायरस शिरून तो कायमचा बाद होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे कम्प्युटर बाद झाल्याच्या तक्रारींमध्येही सध्या वाढ झाली आहे. मॅकेफी या अँटिव्हायरस बनविणाऱ्या कंपनीने यासंबंधीचा अहवाल दिला.
एमा वॉटसनला हॅरी पॉटरमुळे जगातील बच्चा बच्चा ओळखू लागला. त्यामुळे जगभरात तिच्या ऑनलाईन फॅन्सची संख्याही वाढली. मात्र, तिच्या चाहत्यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायबर गुन्हेगारांनी एमाच्या लोकप्रियतेचा फायदा उठविणे सुरु केले आहे. बहुतेक वेबसाईटवर तिचे नाव सर्च केले असता, व्हायरस शिरतो.
या व्हायरसमुळे नेटिझन्सची वैयक्तिक माहिती चोरण्याचे प्रकारही घडत आहेत. एमाचे नाव आठ वेळा सर्च केल्यानंतर, त्यापैकी किमान एकदा तरी असा प्रकार होत असल्याचे डेली एक्समप्रेस या दैनिकाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. गेल्या वर्षी मॉडेल आणि अभिनेत्री हायडी क्लडमच्या सर्चनंतर असे प्रकार होत होते. त्यावेळी ती इंटरनेटवरील `डेंजरस सेलिब्रेटी` ठरली होती. यावर्षी एमाचे नाव आले आहे.
याशिवाय जेसिका बेल, इव्हा मेंडेस, सेलेन गोमेझ आणि हॅली बेरी यांची नावेही `डेंजरस सेलिब्रेटी ऑन इंटरनेट`च्या यादीत आहेत.