www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रेम, रोमान्स, अफेअर... एकाच साच्यातल्या गोष्टी वेगवेगळ्या रंगानं आणि ढंगानं प्रेक्षकांसमोर सादर करणं हीच तर बॉलिवूडची खासियत... शुक्रवारी रिलीज झालेला ‘डेढ इश्किया’मधलं प्रेमही असंच काहिशा वेगळ्या रंगात सादर करण्यात आलंय.
सिनेमा दिग्दर्शक अभिषेक चौबे यानं ‘इश्क’ या शब्दाला वेगळ्या धाटणीत आणखी बोल्ड आणि धडक ढंगात सादर केलंय. एका वेगळ्या प्रेमाला चलतीनुसार ‘सेक्स’चाही तडका लावण्यात आलाय. हा सिनेमा म्हणजे २०१० मध्ये आलेल्या ‘इश्किया’ या सिनेमाचा सिक्वल आहे.
काय आहे कथानक…
हा सिनेमा म्हणजे मध्यमवयीन बेगम पारा (माधुरी दीक्षित) हिची कहाणी... बेगम पारा उत्तरप्रदेशातल्या शानदार वातावरणात वाढलीय. नेहमीच पडद्यात आढळणाऱ्या बेगमच्या जीवनात अनेक पडदे आहेत. तिला आपल्या आयुष्यातल्या भूतकाळाला पडद्यामागेच ठेवायचंय.
एका विशिष्ट हेतूने एक दिवस बेगम आपल्या शहरात एक कवि संमेलनाचं आयोजन करते. जो कवी या संमेलनाचा विजेता ठरेल त्याच्याशी आपण लग्न करणार असल्याची घोषणाही ती करते.
बेगम पाराच्या शहरातच दोन चोर खालूजान (नसरुद्दीन शाह) आणि बब्बन (अर्शद वारसी) राहत आहेत. खालूजान अगोदरपासूनच बेगम पारावर भाळलाय. कवी संमेलनात खालूजान स्वत:ला चांदपूरचा नवाब म्हणवून घेतो आणि बेगम पाराचं मनही जिंकतो. कथा एक वेगळं वळणं घेते जेव्हा बेगम पाराची असिस्टंट मुनिया (हुमा कुरेशी) बब्बनच्या प्रेमात पडते... आणि कथा पुढे सरकते...!
अभिनयाची धुंदी…
या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसतात माधुरी दीक्षित, नसरुद्दीन शाह, हुमा कुरेशी, अर्शद वारसी आणि विजय राम... बेगम पाराचा साज माधुरीनं चांगलाच सजवलाय. माधुरीला ‘परिपूर्ण अभिनेत्री’ का म्हटलं जातं... त्याचं उत्तर या सिनेमात मिळतं. रुप, गुण, नजाकत आणि अदांनी भरलेल्या माधुरीच्या व्यक्तित्वावर ‘चार चाँद’ तेव्हा उमटतात जेव्हा तिच्या चेहऱ्यावर घायाळ करणारं हास्य उमटतं. दर्शकांनाही ती मनमोहिनी घायाळ करते आणि टाळ्या वाजत राहतात. तिनं आपली भूमिका आत्मसात केलीय आणि त्यामुळेच तिचा परफॉर्मन्स अप्रमतीम झालाय, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे माधुरीच्या फॅन्सनं तिचा हा सिनेमा न चुकवता पाहायलाच हवा.
नसरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी यांचाही अभिनय उल्लेखनीय झालाय. माधुरीसमोर हुमा कुठेतरी कमी पडेल, असं वाटतानाच हुमा याला सडेतोड उत्तर आपल्या अभिनयातून देते. माधुरीसमोरही ती उठून दिसते.
एकूण काय तर...
१५२ मिनिटांच्या या सिनेमाची कथा आणि पटकथा मात्र रोमांचकारी ठरलीय. उर्दु पार्श्वभूमीवर वातावरण ठासून दिसून येतं. शायराना अंदाजही कमालीचा झालाय. कोणत्याही वळणावर पकड मात्र ढिली होत नाही. आपल्या अंदाजानं, सीन्सनं आणि संवादांनी हा सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.
पाहा... `देढ इश्किया`चा ट्रेलर
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.