www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तरी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, ही चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही नेमक्या याच विषयाला हात घातलाय. ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे असं आवाहन अडवाणी यांनी केलंय.
संपूर्ण ठाकरे कुटुंबाने एकत्र येऊन काम करणे हीच खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल, असं म्हणत अडवाणींनी जणू राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचंच सूचक आवाहन केल्याचं बोललं जातंय.
मुंबईत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय नेते तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते. त्यावेळी अडवाणींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
यावेळी लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे, हर्षवर्धन पाटील, सुधीर मुनगंटीवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. या शोकसभेला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनीही उपस्थिती लावली. उद्धव यांनी यावेळी आभार न मानता भावपू्र्ण नमस्कार केला. शेवटी दोन मिनिटे उभे राहून सर्वांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.