www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्व राजकीय पक्षांच्यावतीनं ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे, हर्षवर्धन पाटील, सुधीर मुनगंटीवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. या शोकसभेला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनीही उपस्थिती लावली.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मुंबई महापालिकेच्या युतीच्या ज्येष्ठ नगरसेवकांकडून शिवाजी पार्क इथल्या दोन जागांवर विचार सुरू आहे. त्यातील महापौर बंगल्याला लागून असलेली पार्क क्लबची जागा लीजवर देण्यात आली होती. या जागेचं लीज आता संपलंय. त्यामुळे या जागेचा आढावा स्मारकासाठी घेण्यात आलाय तर दुसरीकडे महापालिकेच्या कामगारांच्या क्रीडा भवनाची एक एकरच्या जागेवरही स्मारक होऊ शकतं की नाही याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे या जागांच्या कागदपत्रांची पडताळणी पालिकेच्या कायदे तज्ज्ञांकडून सुरू झाली आहे.