www.24taas.com , झी मीडिया, औरंगाबाद
महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात येणार आहेत.
सिंचन घोटाळ्यात भांडाफोड होईल, अशी भीती असल्यामुळं सरकारनं सरकारी विभागाव्यतिरिक्त इतरांकडील कागदपत्रं स्वीकारता येणार नाहीत, अशी अट चितळे समितीला घातली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केला होता. भाजपच्या या आरोपामुळे सरकारलाही नमते घ्यावं लागलं. त्यानंतर मागील आठवड्यात सिंचन घोटाळ्यासंदर्भातील पुरावे देण्यासाठी चितळे समितीनं विनोद तावडेंना पत्र पाठवलं होतं.
त्यानुसार आज औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे हे चितळे समितीसमोर पुरावे सादर करणार आहेत.
औरंगाबादच्या कांचनवाडी इथून बैलगाडीभर पुरावे घेऊन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याबरोबर खासदार रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि भाजपचे नेते वाल्मी इथं निघणार आहेत. वाल्मी इथं सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीचे कार्यालय आहे. सकाळी ११ वाजता बैलगाडीतून हे पुरावे सादर केल्यानंतर दुपारी १ ते २ च्या सुमारास नक्षत्रवाडी इथल्या संताजी सभागृहामध्ये पत्रकार परिषद होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.