दाभोलकर हत्या : `...तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मानधन स्वीकारू नये`

नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते तसंच सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष आहे. जोवर मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोवर मुख्यमंत्र्यांनी मानधन स्विकारू नये, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 20, 2013, 09:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते तसंच सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष आहे. जोवर मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोवर मुख्यमंत्र्यांनी मानधन स्विकारू नये, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केलीय. ‘झी २४ तास’च्या बातमीपत्रात बोलताना त्यांनी ही मागणी केलीय.
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास दोन महिने झाले तरी अजून ही अंधारातच आहे. हा तपास नेमका का पूर्ण होत नाही याच कोणतही ठोस कारण ना राजकीय पुढारी देतायत ना पुणे पोलीस... हा तपास न लागणं, ही एकूणच व्यवस्थेला बसलेली चपराक आहे.
दोन महिने झाले तरी नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागला नाही म्हणून उद्विग्न होवून डॉक्टरांच्या चाहत्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी काढलेला मोर्चा... अर्थातच राज्याच्या राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीच्या विरोधात, पोलिसांच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात… हा उद्रेक साहजिकच आहे. पण त्याच काहीही सोयर-सुतक कोणालाही नाही. त्याचमुळे पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांना तपासासंदर्भात प्रश्न विचारला तर आता त्या प्रश्नाला उत्तर देणं ही त्यांना जड जावू लागलंय. उलट ते पत्रकारांनाच सबुरीचा सल्ला देत आहेत.

एका बाजुला पोलीस हतबल दिसत असताना राजकीय पुढारी मात्र यावर नेहमी प्रमाणे राजकारण करत आहेत. वास्तविक पाहता, केवळ सामाजिक परिस्तिथी खऱ्या अर्थाने बदलावी, देवाच्या नावाखाली दुकान थाटलेल्यांना चपराक बसावी, समाजातील अनिष्ठ प्रथा दूर व्हाव्यात यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांची हत्या म्हणजे राज्याच्या वैचारिक दिवाळखोरीचं उदाहरण आहे. केवळ एका ध्येयानं आयुष्य भर झटलेल्या डॉक्टरांच्या हत्येचा तपास लागणं म्हणूनच गरजेचं आहे. डॉक्टरांच्या हत्येमुळे कोणत्या वर्गाला विशेष लाभ होणार होता? या हत्येनं काय साध्य झालं? या प्रश्नांची उत्तर त्यासाठीच अपेक्षित आहेत. पण राजकीय इच्छा शक्तीचा अभाव म्हणा की पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा परिपाक म्हणा डॉक्टरांचे मारेकरी अजून ही मोकाट आहेत आणि हे मारेकरी जोपर्यंत सापडणार नाहीत तोपर्यंत तरी महाराष्ट्राच्या वैचारिक दिवाळखोरीचं हे जिवंत उदाहरण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.