`एन मार्ट`ने घातला ग्राहकांना गंडा

मराठवाड्यात मल्टी लेव्हल मार्केटींग या गोंडस नावाखाली एन मार्ट नावाच्या कंपनीनं नागरिकांना 25 कोटींचा गंडा घातलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 6, 2012, 07:43 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
मराठवाड्यात मल्टी लेव्हल मार्केटींग या गोंडस नावाखाली एन मार्ट नावाच्या कंपनीनं नागरिकांना 25 कोटींचा गंडा घातलाय.
एन मार्ट....किराणा सामान आणि घरगुती वापरातल्या 5000हून अधिक ब्रँडेड वस्तू स्वस्तात देणार..... या आमिषाला हजारो लोकांना बळी पाडून आता या एन मार्टचे मॉल महाराष्ट्रात काही दिवसांपासून बंद पडलेत. एकट्या मराठवाड्यातल्या नागरिकांच्या खिशातून `सामानासह ठेवीवर आकर्षक कमीशनची` भूल घालत 25 कोटींहून अधिक रक्कम एन मार्टने काढून घेतलीये. गेल्या 6 महिन्यांपासून एन मार्ट बंद असून स्वतःला माजी राष्ट्रपतींचे पुतणे असल्याचं भासवणारा या कंपनीचा संचालक गोपाल शेखावत फरार आहे. फक्त सभासद नोंदणीच्या नावाखाली मराठवाड्यातून 13 कोटी 75 लाखची एन मार्टनं लूट केल्याचं समोर आलंय.
आता सभासदांनी पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. एन मार्टच्या फ्रेंचायझीच्या नावाखाली लाखो रुपयांचं डिपॉझिटही घेण्यात आलंय. त्यामुळे घोटाळ्याची रक्कम अनेक पटींनी वाढण्याची भीती आहे.