www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..त्यामुळे मराठवाड्यातील जनतेची पाण्याची प्रतिक्षा अजूनही कायम आहे.. पाणी येणार तरी कधी, हे वर्ष सुद्धा दुष्काळातच जगायचे का असा सवाल आता मराठवाड्यातील जनता विचारतेय..
कुणी पाणी देणार का पाणी, पाणी देणार का पाणी.. हे म्हणण्याची वेळ मराठवाड्याच्या जनतेवर आली आहे.. पावसाळा आता संपण्यातच जमा आहे मात्र जायकवाडी धऱणाचा पाणीसाठा अजूनही जेमतेम 29 टक्क्यांवर आहे.. जायकवाडी धऱणाच्या वरच्या भागातील धऱणं ओसंडून वाहतायत.. कित्येक धऱणं 100 टक्के भरली आहे मात्र जायकवाडीला अजूनही पाणी देण्याच नाव कुणी घेत नाही...हे पाणी मिळावं म्हणून आंदोलनंही सुरु आहेत. मात्र या आंदोलनाला कुणीही भीक घालत नाहीत.
राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा वाद कोर्टात असल्याचं कारण देऊन वेळ मारून नेतात..तर राज्याचे महसूल मंत्री आणि औरंगाबादचे पालक मंत्री पाण्याचं नाव काढलं की बोलायलाही तयार नसतात..
जायकवाडी धऱणाच्या जीवावर 1 लाख 87 हजार हेक्टर शेतजमीन आहे, त्यावर 1 लाख 35 हजार शेतकरी जगतायत.. गेली तीन वर्ष दुष्काळानं शेतकरी देशोधडीला लागला आहे. धऱण 33 टक्क्यांपर्यंत भऱल्याशिवाय पाणी शेतीला देता येत नाही अशा परिस्थितीत बळीराजाने करावं तरी काय असा प्रश्न त्यांना पडलाय..
गेली दोन वर्ष मराठवाड्यानं दुष्काळाच्या रुपात मरणयातना भोगल्या आहेत. य़ंदा पाऊस झाला त्यामुळे थोडं बहुत पिकं उभ राहिलय.. मात्र पाऊस गेल्यानंतर काय असा प्रश्न बळीराजाच्या मनात कायम आहे.. जायकवाडीत पाणी आलं तरच काही खरं अन्यथा मराठवाड्यातील शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होतीय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.