मराठवाड्यात दुष्काळ, आश्वासनांचा पाऊस

मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना, आश्वासानांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय. मात्र या दौ-यांत दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीय फक्त निराशाच....

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 5, 2013, 06:40 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना, आश्वासानांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय. मात्र या दौ-यांत दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीय फक्त निराशाच....
मराठवाड्यात सध्या दुष्काळाची ही भीषण स्थिती आहे. एकेका हंड्यासाठी करावी लागतेय मैलोनमैल पायपीट आणि जीवघेणी कसरत.. मराठवाड्यात सुरु असलेले हजार टँकरही अपुरे पडतायेत. पुढे एप्रिल, मेमध्ये काय होणार, असा प्रश्न दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यात आहे. अशा परिस्थितीत नेतेमंडळींचं मात्र सुरुय ते दुष्काळाचं पर्यंटन.. दुष्काळात आलाय तो राजकीय नेत्यांच्या दौ-यांचा पूर.. सुरुवात झाली 3 फेब्रुवारीच्या उद्धव ठाकरेंच्या सभेनं.. सरकारवर टीकास्त्र सोडण्यापलिकडे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून काही हात आलं नाहीच.
त्यानंतर खुद्द देशाचे कृषीमंत्री मराठवाड्याच्या दौ-यावर आले. दोन दिवस दुष्काळाची पाहणी करुन त्यांनी दिलं ते मदतीचं आणि केंद्रीय टीम पाहणी करेल, असं आश्वासन.. मग याच धामधुमीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही मागे कशी राहतील.. पर्यटनाची हौस भागवून घेताना दिलं बादलीभर आश्वासन आणि फुकटचे सल्ले. त्यानंतर मग विरोधकांनी जाग आली.. गोपीनाथ मुंडेंपासून विनोद तावडेंपर्यंत अनेकांनी दुष्काळी भागाचे दौरे केले.. आणि सरकारवर टीका करण्याची हौस भागवून घेतली. यानंतर मराठवाड्याच्या दौ-यावर आलेल्या राज ठाकरेंच्या दौ-यात महत्त्व आलं ते दुष्काळापेक्षा अजित पवार-राज ठाकरे युद्धाला.. दुष्काळाचा उल्लेख झाला खरा पण तो गरजेपुरताच..

हे तर झाले मातब्बर नेते.. मात्र याचबरोबरच अनेक चिल्लर नेत्यांचेही दौरे झाले .. त्याला तर गणतीच नाही.. वारेमाप गाड्यांनी गावोगावी धावपळ उडाली.. हेलिकॉप्टरच्या पंख्यांनी धूळ उडाली.. दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातून आलं ते या धुळीमुळं पाणी..पण खरखुरं पाणी पोहचलंच नाही... गावात आलेल्या नेत्यांना पहायला सेलिब्रिटींसारखी गर्दी झाली..पण या नेत्यांनी दिली ती केवळं कोरडीठाक आश्वासनं आणि त्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन.. राजकीय नेते परतल्यावर अंगावरची धूळ झटकतं शेतकरी बाया माणसं.. पुन्हा त्याच विवंचनेत अडकली.. हंडाभर पाणी, चा-यासाठी दररोजचा संघर्ष पुन्हा तसाच सुरु राहिला..