औरंगाबाद : मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी नगरसेवकांवर छळाचा आरोप केलाय. छळाला कंटाळून डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी निवृत्तीसाठी अर्ज केलाय. आणि आता पुन्हा महापालिकेत जायचं नाही असा पवित्रा घेतलाय. मात्र डॉ. जयश्री कुलकर्णी अकार्यक्षम असल्याचा आरोप महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांनी केलाय.
औरंगाबादेत डेंग्युचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य अधिकारी काहीच करत नसल्याचा आरोप डॉ. कुलकर्णींवर केला जातोय. डॉ. कुलकर्णींकडून आरोग्य अधिका-याचा पदभार काढून घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवकही आक्रमक झाले. त्यामुळे आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डॉ. कुलकर्णी यांना 10 दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं. मात्र मला खुलासा करण्यास वेळंच दिला नसल्याचं सांगत जयश्री कुलकर्णींनी आयुक्तांकडे थेट निवृत्तीसाठीच अर्ज केला. तर दुसरीकडे आज त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेल्यावर्षी पीसीपीएनडीटी मोहिमेत चांगलं काम केलं म्हणून गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी अकार्यक्षम असत्या तर त्यांना पुरस्कार मिळाला असता का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. तसंच त्यांना त्रास देणारे हे नगरसेवक कोण याचीही चर्चा आता रंगायला लागली आहे.
जयश्री यांना मिळालेले पुरस्कार
चार ते पाच पुरस्कार मिळणारा अधिकारी अचानक अकार्यक्षम कसा ठरतो याचंच कोडं अनेकांना पडलंय. महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी याबाबक भूमिका घेणं अपेक्षीत होतं मात्र त्यांनीही अधिका-यांच्या बाजूने काहीही भूमिका घेतली नसल्याचं समोर येतय. या परिस्थितीत एखाद्या महिला अधिका-याने रडून आपली कैफीयत मांडणे खरचं भूषणावह आहे का, याचाही विचार महापालिकेनं करण्याची गरज निर्माण झाली आहे. नक्की असे काय झाले की सगळे नगरसेवक कुलकर्णी यांच्या विरोधात उठलेय. याचा तपास करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.