www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात आलेत. तब्बल १४ हजार पानांची कागदपत्रं आणि पुरावे सादर करण्यात आलीयत. बैलगाडीमधून ४ बॅग्ज भरून हे पुरावे सादर केलेत.
सिंचन प्रकल्पांच्या उभारणीत सुमारे ७० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सरकारनं या संदर्भात श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेमध्ये (वाल्मी) या समितीचं कार्यालय आहे. या समितीसमोर भाजपनं पुरावे सादर केले.
या संदर्भात प्रदेशाध्यक्ष फडणवीस म्हणाले, `आमच्या अंदाजानुसार हा घोटाळा हजारो कोटी रुपयांचा आहे. सिंचनातील गैरव्यवहाराला केवळ अधिकारी जबाबदार नाहीत. अनेक कागदपत्रांवर मंत्र्यांनी दिलेले मंजुरीचे आदेश आणि त्यांच्या सह्या आहेत. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि सध्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळातील ही कागदपत्रं आहेत. त्यावरून गैरव्यवहारांत मंत्र्यांचाही सहभाग स्पष्ट होतो. केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाऊ नये. चितळे समितीनं मंत्र्यांवर कारवाईबाबतही सूचना करावी.`
आम्ही समितीसमोर सादर केलेले पुरावे पुरेसे आहे. पण आणखी पुरावे देण्यासाठी आम्ही समितीकडे पंधरा दिवसांचा वेळ मागितलाय, अशीही माहिती त्यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याबरोबर खासदार रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर आणि भाजपचे नेते हे ही उपस्थित होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.