www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात आळंदी नगरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय. आज संध्याकाळी चार वाजता पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होईल. आजचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम गांधीवाड्यात असणार आहे. या सोहळ्यासाठी त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झालीय. यंदा पहिल्यांदाच पालखीचा रथ हायटेक बनवण्यात आलाय.
भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या डीआरडीओ अर्थात संरक्षण आणि विकास संस्थेनं हा रथ तयार करण्यात आलाय. वर्षभर या रथाचं काम सुरु होतं. यंदा पहिल्यांदाच हा रथ बॅटरीवर चालाणार आहे. त्यामुळे दिवेघाटासारख्या अवघड ठिकाणी बैलांना त्रास होणार नाही. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक सुविधा या रथामध्ये आहेत.
तुकाराम महाराजांची पालखीही निघाली
जगतगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी 10 च्या सुमारास इनामदारवाड्यातून निघणार आहे... इनामदार वाड्यातून निघाल्यानंतर पालखी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात पोहचणार आहे. हिंदु मुस्लिम ऐक्याचं दर्शन यानिमित्ताने होतं. त्यानंतर तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डीत असणार आहे.
शनिवारी मुख्य मंदिरातून दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास तुकोबांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. जवळपास पाचच्या सुमारास तुकोबारायांच्या पालखीनं इनामदारवाड्यात विसावा घेतला. पालखीत मोठ्या संख्येनं वारकरी आणि वेगवेगळ्या दिंड्या सामील झाल्यात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.