तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाची सजावट कशी करावी? असा प्रश्न पडला असेल, तर जाणून घ्या 'या' 5 खास टिप्स

Republic Day 2025: देशभक्तीपर कार्यक्रमांच्या ठिकाणी नेमकी सजावट कशी करावी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. या दिवसाच्या खास सजवटीसाठी 5 खास टिप्स जाणून घेऊयात...

Updated: Jan 22, 2025, 01:17 PM IST
 तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाची सजावट कशी करावी? असा प्रश्न पडला असेल, तर जाणून घ्या 'या' 5 खास टिप्स title=

Republic Day 2025 Decoration Ideas: भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. विविध राज्यांमध्ये तेथील परंपरिक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मात्र तितक्याच उत्साहाने देशभरामध्ये राष्ट्रीय सणही साजरे केले जातात. वेगवेगळ्या प्रांतांचे, राज्यांचे लोक एकजुटीने राष्ट्रीय सण साजरे करतात. त्यातही प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येक भारतीयाचा उत्साह शिगेला पोहचल्याचं पाहायला मिळतं.

प्रजासत्ताक दिन आता काही दिवसांवर आला आहे. या दिवशी अगदी दिल्लीतील राजपथापासून देशभरातली वेगवेगळ्या शाळांमध्ये, सोसायट्यांबरोबरच अनेक कार्यालयांमध्ये झेंडावंदनाबरोबरच विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आशा कार्यक्रमांची पूर्वतयारी आतापासूनच सुरु झाली आहे. मात्र देशभक्तीपर कार्यक्रमांच्या ठिकाणी नेमकी सजावट कशी करावी? असा प्रश्न पडतो. या दिवसाच्या खास सजवटीसाठी 5 खास टिप्स जाणून घेऊयात...

1. भिंती रंगवणे

या दिवशी कार्यक्रमाचे ठिकाण सोप्या पद्धतीने आकर्षक बनवण्यासाठी भिंतींना केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांनी रंगवून राष्ट्रध्वजासारखी बॅकग्राऊण्ड तयार करता येईल.

2. राष्ट्रध्वजाचे बॅनर आणि सजावट  

बॅनर: भारतासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचे बॅनर लावून सजावट करता येईल.  
फुलांची सजावट: झेंड्याच्या रंगांचे हार आणि पुष्पगुच्छ बनवून सजावट करता येईल.  
फुगे: झेंड्याच्या रंगांचे फुगे वापरून आकर्षक डिझाईन्स तयार करता येतील.  
रांगोळी: कार्यक्रम असलेल्या ठिकाणी प्रवेशद्वारावर प्रजासत्ताक दिनविशेष रांगोळी काढता येईल.

3. देशभक्तीपर घोषवाक्ये  

पोस्टर्स: देशभक्तीपर घोषवाक्यं असलेले पोस्टर्स लावून भिंती सजवता येतील.  
स्लोगन: भिंतींवर देशभक्तीपर घोषवाक्यं लिहून देशप्रेमाचा संदेश देता येईल.

4. थीमवर आधारित सजावट  

स्वातंत्र्याचा काळ: स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चित्रे तयार करून सजावट करता येईल.  
भारतीय संस्कृती: भारतीय संस्कृती दर्शवणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातूनही सजावट करण्याची कल्पना अंमलात आणता येईल.  
भारतीय सैन्य: भारतीय सेनेच्या शौर्य कथांचे चित्रण करून आकर्षक सजावट करू शकता.

5. स्वत: तयार केलेल्या खास कलाकुसरीच्या वस्तू (handmade)

हॅण्डमेड वस्तू: विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू शाळेतील कार्यक्रमांच्या सजावटीसाठी वापरता येतील.  
चित्रकला स्पर्धा: विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देता येईल. नंतर या चित्रांचे प्रदर्शन भरवता येईल.

या साऱ्या गोष्टी शाळा, सोसायट्या आणि कार्यालयाच्या सजवटीसाठी प्रभावी ठरतील आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा उत्साहदेखील वाढवतील, यात शंका नाही. काय मग कधी लागताय कामाला?