www.24taas.com, नवी दिल्ली,
संसदेवरील हल्ल्यातील दोषी प्रमुख आरोपी अफजल गुरु याला आज शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिहार कारागृहात फाशी दिले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
अफजल गुरुने फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी राष्ट्रपतींकडे दाखल केलेला दया अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांनी फेटाळला. आज त्याला फाशी देण्यात आली आहे. अफजल गुरु हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आहे.
दहशतवादी अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ला फाशी दिल्यानंतर, २००१ मध्ये संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरूला फाशी केव्हा होणार, असा प्रश्नर विचारण्यात येत होता. अफजल गुरूला दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्याच्या फाशीची तयारी करण्यात आली होती.
२६-११ मुंबई हल्ल्यातील दोषी कुरकर्मा अजमल कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात गुपचूप फाशी देण्यात आली होती. त्याच प्रमाणेच अफजल गुरुलाही फाशी देण्यात आले आहे.
पाच दहशतवाद्यांनी संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी हल्ला करून नऊ सुरक्षा रक्षकांना ठार मारले होते. त्यानंतर उडालेल्या चकमकीत पाचही दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला होता. या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला दोषी ठरविण्यात आल्यानंतर देशभरातून त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती.