'पोलिसांचं अपयश नाही; बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती'

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हैदराबादमध्ये दाखल झालेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी त्यांनी यावेळी केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 22, 2013, 10:27 AM IST

www.24taas.com, हैदराबाद
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हैदराबादमध्ये दाखल झालेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर त्यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन जखमींचीही विचारपूस केली. ‘बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती... पण, हे पोलिसांचं अपयश म्हणता येणार नाही’ असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांच्याबरोबर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी हेही उपस्थित होते.

स्फोटामध्ये १४ जण मृत्यूमुखी पडलेत तर ११९ जण जखमी झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिलीय. स्फोटातील ६ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. जखमींचा वैद्यकीय खर्च सरकारकडून केला जाणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून सहा लाखांची तर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत मिळणार आहे.
गुरुवारी दिलसुखनगर या हैदराबादच्या अत्यंत गजबजलेल्या भागात ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या स्फोटांमुळे एकच गडबड उडाली. याधीही या भागात २००२ मध्ये स्फोट घडवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा निष्पापांच्या किंचाळ्यांनी हा भाग हादरला. स्फोटानंतर लगेचच NIA, NSG, IB, ATS अशी तपास पथकं तात्काळ हैदराबादच्या दिशेने रवाना झाली. १०० ते १५० मीटर अंतरावर असलेल्या सायकलवर ठेवलेल्या टिफीन बॉक्समधून हे स्फोट घडवण्यात आल्याचं समजतंय. या हल्ल्याची पूर्वसूचना दोन दिवसांपूर्वी मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी म्हटलं होतं. त्यानुसार राज्यांना सर्तकतेचा इशारा दिला होता असंही त्यांनी म्हटलंय. हैदराबादच्या या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

‘हैदराबादमध्ये झालेले हे स्फोट वेदनादायी आहेत. केंद्र सरकार हैदराबादच्या या स्फोटानंतर पुर्णपणे राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करणार आहे. त्याचप्रमाणं भविष्यात अशा प्रकारे दहशतवादी घटनांबद्ल सतर्कता बाळगावी’ असं आवाहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी केलय. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. या स्फोटामागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय. पण यामुळे पुन्हा एकदा देशातील जनता दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित नाही हेच दिसून आलंय.