ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आशा बॉलर्सवरदेखील केंद्रीत झाल्या आहेत. फस्ट बॉलर झहीर खानने टीममध्ये कमबॅक केले आहे. तर ईशांत आणि उमेश यादवची जोडी आपल्या वेगवान माऱ्याने कांगारूंवर हल्ला करायला सज्ज आहे. तर आर. अश्विन आणि प्रग्यान ओझाने विंडिजविरूद्ध आपल्या फिरकीची कमाल दाखवली आहे.
वेग ही भारताची कमजोरी आहे आणि हाच वेग ऑस्ट्रेलियाची ताकद आहे असं म्हणणं कदाचित योग्य ठरणार नाही. टीम इंडियावर संकट ओढवल्यास भारतीय बॉलर्सदेखील कांगारूंवर हल्ला चढवू शकतात. यावेळी परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली आहे. यावेळी झहीर खान, ईशांत शर्मा, उमेश यादव, विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुनवर फास्ट बॉलिंगची जबाबदारी असणार आहे. तर कांगारूंना फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यासाठी आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा हे सज्ज असतील.
बऱ्याच दिवसांनी टीममध्ये कमबॅक करणाऱ्या झहीर खानवर सर्वात जास्त आशा केंद्रीत झाल्या आहेत. मागील पाच टेस्टमध्ये झहीरच्या नावे १७ विकेट्स जमा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये झहीरने केवळ तीन टेस्ट खेळल्या असून त्यामध्ये त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ईशांत शर्मावरदेखील आशा केंद्रीत झाल्या आहेत. खास करुन रिकी पॉन्टिंगसाठी ईशांत अनेकदा धोकादायक ठरला आहे. मागील दौ-यावरील तीन टेस्टमध्ये ईशांतने ११ विकेट्स घेतल्या आहेत. युवा प्लेअर्समध्ये उमेश यादव टीम इंडियासाठी फायदेशीर ठरला आहे. नुकत्याच संपलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या सीरिजमध्ये त्याने २ टेस्टमध्ये ९ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटूदेखील भारताच्या युवा ब्रिगेडचं कौतुक करतात.
भारताच्या युवा बॉलर्समध्ये गुणवत्ता असून भारताच्या इतर बॉलर्ससारखे ते नाहीत. त्यांची ऍक्शन चांगली आहे असून ऑस्ट्रेलियात हे बॉलर्स चांगली कामगिरी करू शकतात.
फिरकीमध्ये नक्कीच हरभजन सिंगची कमतरता जाणवेल. मात्र, आर. अश्विन आणि प्रग्यान ओझाची जोडी भज्जीची भरपाई करण्याची क्षमता ठेवतात. विंडिजविरूद्धच्या सीरिजमध्ये अश्विनने तीन टेस्टमध्ये २२ विकेट्स घेतल्या आहेत. तर प्रग्यान ओझाने ३ टेस्टमध्ये २० विकेट्स घेतल्या आहेत.
ही आकडेवारी पाहता प्रत्येक बॉलरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्याचचं दिसून येतं.