युरो २०१२ : फ्रान्सची युक्रेनवर सहज मात

ग्रुप 'डी' मध्ये फ्रान्सनं युक्रेनवर २-० ने सहज विजय मिळवला. मेनेझ आणि कबाईने प्रत्येकी एक गोल करत फ्रान्सला हा विजय मिळवून दिला. दरम्यान, प्रथमच युरो कपमध्ये सहभागी झालेल्या युक्रेनने फ्रान्सला पहिल्या हाफमध्ये चांगलीच टक्कर दिली.

Updated: Jun 16, 2012, 07:27 AM IST

www.24taas.com, वॉरसॉ, पोलंड 

 

ग्रुप 'डी' मध्ये फ्रान्सनं युक्रेनवर २-० ने सहज विजय मिळवला. मेनेझ आणि कबाईने प्रत्येकी एक गोल करत फ्रान्सला हा विजय मिळवून दिला. दरम्यान, प्रथमच युरो कपमध्ये सहभागी झालेल्या युक्रेनने फ्रान्सला पहिल्या हाफमध्ये चांगलीच टक्कर दिली.

 

दोनदा युरो कपचे विजेतेपद पटकावलेल्या फ्रान्सने नवख्या युक्रेनचा धुव्वा उडवला. फ्रान्सने युक्रेनवर २-० ने सहज विजय मिळवत क्वार्टर फायनलसाठी आपली दावेदारी अधिक मजबूत केलीय. खरंतर प्रथमच युरो कपमध्ये सहभागी झालेल्या युक्रेनने आपल्या पहिल्याच मॅचमध्ये स्विडनवर २-१ ने विजय मिळवत धक्कादायक विजयाची नोंद केली होती. यामुळेच फ्रान्सविरूद्धदेखील त्यांच्याकडून अशाच धक्कादायक कामगिरीची अपेक्षा होती. मात्र अनुभवाच्या जोरावर अखेर फ्रान्सनेच बाजी मारली. दरम्यान, या मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणल्यानं पहिल्या पाचच मिनिटांनंतर मॅच थांबवण्यात आली ती जवळपास एका तासानंतर पुन्हा सुरू झाली. यानंतर पहिल्या हाफमध्ये युक्रेनने चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत फ्रान्सला एकही गोल करू दिला नाही. त्यांनी अनेकदा फ्रान्सच्या गोलपोस्टवर हल्ले चढवत गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे गोल करण्याचे मनसुबे फ्रान्सिसी गोलकीपर ह्युगो लॉरिसने हाणून पाडले.

 

दुस-या हाफमध्ये पहिल्या काही मिनिटांतच फ्रान्सने आघाडी घेतली. मॅचच्या ५३ व्या मिनिटाला बेंझेमाच्या पासवर जेरेमी मेनेझने पहिला गोल करत फ्रान्सला गोल्सचं खातं उघडून दिलं. यानंतर तिस-या मिनिटालाच पुन्हा बेंझेमाच्याच पासवर कबाईने दुसरा गोल करत फ्रान्सला २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. फ्रान्सच्या या आक्रमणामुळे युक्रेनवर चांगलाच दबाव आला आणि नवख्या युक्रेनला नंतर आपला खेळ काही उंचावता आला नाही आणि अखेर त्यांना ही मॅच गमवावी लागली. या विजयामुळे पहिली मॅच ड्रॉ झालेल्या फ्रान्सने क्वार्टर फायनलच्या दिशेने आगेकूच केलीय.

 

.