www.24taas.com, मुंबई
रामनवमीनिमित्त राज्यभरात भाविकांचा उत्साह दिसून येतो आहे. शिर्डी, नाशिकसह अनेक ठिकाणी आज रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतही इस्कॉन मंदीरात भाविकांनी गर्दी केली होती. मुंबईतल्या वडाळा भागातल्या प्रसिद्ध राममंदीरातही भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
दिवसभर याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राम नवमी उत्सव पुण्यातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावात गुढ्या उभारून राम नवमी साजरी करण्यात आली. इथलं राममंदिर १३ व्या शतकातील आहे. सलग आठ दिवस याठिकाणी रामनवमी उत्सव साजरा केला जातो. या परिसरातील प्रती अयोध्या म्हणून नवलाख उंबरे येथील राममंदिर प्रसिद्ध आहे.
नाशिकमध्येही रामनवमीचा उत्साह पहायला मिळतो आहे. प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात रामनवमी महोत्सवाचा जल्लोष आहे. गेल्या आठ दिवसांपासून इथं हा उत्सव सुरु आहे. भक्तांची इथं मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळते आहे. दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. आज या महोत्सवाची सांगता होणार आहे.