पश्चिम रेल्वेने ट्रॅक्शन नेटवर्क डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेटिंग करंट) बदलण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. बांद्रा ते भाईंदर दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० दरम्यान रेल्वेसेवा पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. विलेपार्ले ते बोरिवली दरम्यान टॅक्शन नेटवर्कच्या कामासाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सीएसटी ते अंधेरी दरम्यान हार्बर लाईन आणि पनवेल ते अंधेरी दरम्यानच्या सेवाही मेगाब्लॉकमुळे बाधित होणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते नवे २५,००० वोल्टचे एसी नेटवर्क हे १५०० वोल्टच्या डीसी नेटवर्कच्या तुलनेत वीजेची बचत करतं आणि त्यामुळे अधिक सेवा प्रवाशांना उपलब्ध करुन देता येतील.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी चर्चगेट ते बांद्रा आणि भाईंदर ते विरारच्या दरम्यान १५४ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच अंधेरी, भाईंदर आणि वसईरोडवर मेल एक्सप्रेस थांबवण्यात येणार आहेत. प्रवाशांना मेल आणि एक्सप्रेसने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेस्ट व्यवस्थापनाने रविवारी भाईंदर आणि बांद्राच्या दरम्यन १०० अधिक बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. मेगाब्लॉक सुरु होण्याच्या अगोदर पहिली लोकल चर्चगेटवरुन सकाळी १०.०५ वाजता तसेच जलद मार्गावर विरार ते अंधेरीच्या दरम्यान सकाळी ९.३५ वाजता सोडण्यात येणार आहे. विरारहून चर्चगेटकरता जलद मार्गावर शेवटची लोकल सकाळी ९.३५ वाजता सोडण्यात येणार आहे.