रविंद्र कांबळे, www.24taas.com, सांगली
सांगली जिल्ह्यातील तिकोंडी गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत काँग्रेसला मतदान केल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे. या गावात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने या गावाचा चक्क पाणीपुरवठाच बंद केला आहे. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण आहे.
तिकोंडी गावातील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसला मतदान केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने दादागिरी सुरू केली आहे. विरोधात मतदान केल्यामुळे या गावाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मुळात हे दुष्काळी गाव असल्यामुळे येथे पाणीपुरवठा टँकरद्वारे केला जातो. मात्र, मतमोजणी झाल्यापासून या गावात टँकर फिरकला नाही. तिकोंडीमधील दलित वस्तीने यावेळी राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसला मतदान केल्यामुळे या गावाला पाणी न देण्याचा निर्णय प्रस्थापितांनी घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीमध्येही उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कर्ज, उतारे यासंदर्भातील गोष्टींसाठी ग्रामपंचायतीकडे गेल्यास तुम्ही काँग्रेसला मतदान केलं आहे, तेव्हा त्यांच्याकडेच या गोष्टी मागा अशा शब्दांत ग्रामस्थांना मदत नाकारली जात आहे.
मात्र, आम्ही कधीच ग्रामस्थांना असा त्रास दिला नसल्याचं तिकोंडीचे उपसरपंच महादेव राजगोंड यांचं म्हणणं आहे. काही ड्रायव्हर्स अचानक सुट्टीवर गेल्यामुळे गावात टँकर आला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
आपल्याला निवडून न दिल्याची शिक्षाच राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामस्थांना देत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या या दादागिरीमुळे तिकोंडी गावाच्या ग्रामस्थांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
[jwplayer mediaid="54837"]