www.24taas.com, पिंपरी चिंचवड
अजित पवारांनी दम भरुनही पिंपरी चिंचवडमधले नगरसेवक त्यांचं काही ऐकायाला तयार नाहीत. बिल्डर्ससाठी काम करु नका, असं अजितदादांनी सुनावल्यानंतरही पिंपरी चिंचवड महापालिकेनं प्राधान्य क्रम ठरवण्याचा निर्णय घेतलाय.
त्यावरुन वाद निर्माण झालाय. बिल्डरांसाठी कामं करू नका, असा सल्ला अजितदादांनी पिंपरीतल्या नगरसेवकांना दिलाय. पण तो सल्ला मानतील ते पिंपरीतले नगरसेवक कसले. महापालिकेनं विकास कामांची प्रायोरिटी लिस्ट अर्थात प्राधान्य क्रम ठरवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतलाय. त्यानुसार जमीन संपादित करताना जिथ काम होणार आहे त्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे.
पण हा निर्णय फक्त बिल्डर्सच्याच हिताचा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसनं मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय. विकास कामांसाठी प्राधान्य क्रम असणं गरजेचं आहे. पण ते जर बिल्डर्सचं हित लक्षात घेऊन होणार असेल, तर नक्कीच ते चुकीचं आहे.