शिर्डी संस्थानचे चार विश्वस्त अडकणार

शिर्डीच्या साई संस्थानच्या चार माजी विश्वस्तांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. बनावट कागदपत्रं तयार करुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप या विश्वस्तांवर आहे.

Updated: May 13, 2012, 04:00 PM IST

www.24taas.com, शिर्डी

 

शिर्डीच्या साई संस्थानच्या चार माजी विश्वस्तांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. बनावट कागदपत्रं तयार करुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप या विश्वस्तांवर आहे. तीन महिन्यांपूर्वी या चार विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

साई संस्थानच्या चार विश्वस्तांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज कोपरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे वाहनांची बिलं दाखवून लाखों रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी के.सी.पाडें, रा.ग.कर्णिक, कॅप्टन वासुदेवा आणि ऊर्मिला जाधव या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी वाहने वापरून त्या बदल्यात संस्थानच्या तिजोरीतून प्रतिकिलोमीटर ८ रुपये दराने बिलं उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

 

२००४ ते २००७ या कालावधीत या चारही विश्वस्तांनी सुमारे १ लाख ६८ हजार रुपये रकमेचा अपहार केल्याचं उघड झालं आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता या विश्वस्तांना अटक कधी होणार असा सवाल करण्यात येतो आहे. या विश्वस्तांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.