www.24taas.com, नाशिक
चांदवड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून तीन आरोपी पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे. अश्रफ हमीद शेख, खुर्शीद हमीद शेख, सर्फराज गुलाम चौधरी अशी आरोपींची नावं असून ते मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत.
टॉवरची बॅटरी चोरणारे हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. नाशिकरोड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात त्यांना नुकतीच अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीची हवा खाणा-या तिघांना चांदवड पोलिसांकडं वर्ग करण्यात आलं होतं. याआधीही चांदवड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात त्यांना अटक केली होती. मात्र जामिनावर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्यामुळे चांदवड मधील इतर गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे का याची चौकशी करण्यासाठी त्यांना चांदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. मध्यरात्री तीन साडेतीनच्या सुमारास लॉकअपचे गज कापून ते तिघंही फरार झालेत.
खुर्शिद्ची पत्नी त्याला भेटण्यासाठी शुक्रवारी रात्री आली होती. त्यावेळी तिने पोलिसांची नजर चुकवून हेक्सोब्लेड आरोपींकडे दिल्याचा संशय पोलिसांनी वर्तवलाय. पोलीस कोठडीतून तीन गुन्हेगार गज कापून पळून जातात आणि पहारेकऱ्याला त्याचा पत्ताही लागत नाही या घटनेनं ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली असून रात्री कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेत. थेट पोलीस कोठडीतूनच आरोपी फरार झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झालीत मात्र अद्याप कोणाचाही तपास लागलेला नाही.