जळगावात पाणीटंचाई, बैठकीत खडाजंगी

राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीमुळं सरकारच्या तोंडचं पाणी पळालंय. जळगावात मात्र पाणीटंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचं आढळून आलंय. याबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय आला.

Updated: Apr 27, 2012, 04:49 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीमुळं सरकारच्या तोंडचं पाणी पळालंय. जळगावात मात्र पाणीटंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचं आढळून आलंय. याबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय आला.

 

पाण्यासाठी वणवण, टँकरनं पाणीपुरवठा, कोरड्या पडलेल्या विहीरी तर कुठे हातपंपाची कमी झालेली पाण्याची पातळी. प्राण्यांना चारा नाही. राज्याच्या ९ जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळं निर्माण झालेलं चित्र. सरकारनंही त्याची कबुली दिली आहे. मात्र या नऊ जिल्ह्यांशिवाय इतर भागातही पाणीटंचाईचं चित्र सारखंच आहे. जळगावकरही काहीसा असाच अनुभव घेत आहेत. जिल्ह्यात दुष्काळ नसला तरी तीव्र पाणीटंचाईचा सामना त्यांना करावा लागतोय. इतकंच नाहीतर इथल्या पिंपरी सेकम गावात दूषित पाण्यामुळं चार जणांचा मृत्यू झालाय.

 

या संदर्भात राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी जळगावात आढावा बैठक घेतली. मात्र या बैठकीत पाणीटंचाईची स्थिती निवारण्याबाबत अधिका-यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. त्यामुळं विरोधी पक्षनेता एकनाथ खडसेंनी गटविकास अधिकारी हप्तेखोर असल्याचा आरोप केला.यावेळी पाणीपुरवठा मंत्र्यांनीही अधिका-यांची चांगलीच कानउघडणी केली. पाणी टंचाईवर तोडगा काढण्याऐवजी ही आढावा बैठक रंगली ती लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या खडाजंगीमुळं. त्यामुळं जळगावकरांची पाणीटंचाईची समस्या जैसे थे आहे.