विदर्भातला गोसीखुर्द प्रकल्प बोंबलला

विदर्भातला गोसीखुर्द प्रकल्प २४ वर्षानंतरही रेंगाळलेला आहे. मोठा गाजावाजा करत काम सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पाचा खर्चही आता ३६ पटींने वाढलाय. या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप होत आहे.

Updated: May 15, 2012, 10:56 AM IST

www.24taas.com, गोसीखुर्द 

 

विदर्भातला गोसीखुर्द प्रकल्प २४ वर्षानंतरही रेंगाळलेला आहे. मोठा गाजावाजा करत काम सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पाचा खर्चही आता ३६ पटींने वाढलाय. या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप होत आहे.

 

सुमारे अडीच दशकानंतरही विदर्भातला गोसीखुर्द सिंचन प्रकल्प आजही अपूर्णच आहे याची साक्ष देणारा हा फलक... ३१ मार्च १९८३ ला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर २२ एप्रिल १९८८ ला या प्रकल्पाचं काम सुरु झालं. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातल्या शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आजही या प्रकल्पाचं काम जैसे थे असल्यानं शेतक-यांच्या आशेवरच पाणी फेरलं गेलंय. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवातीपासून गती मिळाली नाही. जमिनीचं अधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, निधीचा अभाव आणि प्रकल्पातील गैरव्यवस्थापन यामुळं याचं काम वारंवार रेंगाळलं.

 

या विलंबामुळे २४ वर्षानंतर प्रकल्पाचा खर्च ३६ पटींने वाढलाय. सुरुवातीला ३७२ कोटी असलेला खर्च आज १३, ५९७ कोटींच्या घरात गेलाय. राष्ट्रीय प्रकल्प अशी मान्यता मिळूनही निकष पूर्ण न केल्याने गोसीखुर्द प्रकल्पाला मिळणारा निधी केंद्राने राखून ठेवला. शिवाय या प्रकल्पाच्या कालव्याचं बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप होतोय. तसंच २,५०,८००  हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्प क्षेत्रात पाण्याऐवजी पैसे जिरल्याचं आरोपही होतोय.

 

मुख्यमंत्र्यांनीही याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी मान्य करत केंद्राकडून निधी मिळवण्याबाबत असमर्थता व्यक्त केलीय. ढिसाळ व्यवस्थापन आणि भ्रष्टाचारामुळे गोसीखुर्द प्रकल्प रखडलाय. केंद्राचा निधी मिळेना आणि राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट यामुळं हा प्रकल्पाचं भविष्य आता रामभरोसे आहे...