विदर्भाचंही होऊ शकतं 'इस्त्राईल' – गडकरींचा दावा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक नितीन गडकरी यांनी नुकताच ५० शेतकऱ्यांना घेऊन इस्त्रायलचा कृषी दौरा केला. त्यांनी विदर्भातही इस्त्रायलासारखी शेती होऊ शकेल, असा ठाम विश्वास विशेष चर्चासत्रात व्यक्त केलाय. 'पूर्ती’ उद्योग समूहातर्फे शेतकऱ्यांना विशेष सवलतीत सोलर पंपही दिले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलंय.

Updated: Jul 19, 2012, 11:33 AM IST

www.24taas.com, नागपूर

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक नितीन गडकरी यांनी नुकताच ५० शेतकऱ्यांना घेऊन इस्त्रायलचा कृषी दौरा केला. त्यांनी  विदर्भातही इस्त्रायलासारखी शेती होऊ शकेल, असा ठाम विश्वास विशेष चर्चासत्रात व्यक्त केलाय. 'पूर्ती’ उद्योग समूहातर्फे शेतकऱ्यांना विशेष सवलतीत सोलर पंपही दिले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलंय.

 

राष्ट्रीय राजकारणात व्यस्त असतानाही नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांसाठी वेळात वेळ काढून इस्त्रायल इथं ‘एग्रीटेक’ प्रदर्शनाला भेट दिली. इस्त्रायलचं तंत्रज्ञान विदर्भातील शेतकऱ्यांना कसं उपयुक्त होऊ शकेल, या उद्देशाने त्यांनी ५० शेतकऱ्यांबरोबर हा दौरा केला. एवढचं नाही तर या दौऱ्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये चर्चासत्राचं आयोजन करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केलं. वर्षाला केवळ ३५० मिलिमीटर पाऊस पडूनही जगात शेती उत्पादनात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या इस्राईलसारखी शेती विदर्भातही शक्‍य असल्याचंही त्यांनी सांगितलं. विदर्भात सर्वच बाबतीत अनुकूल वातावरण आहे. विशेष म्हणजे इथला शेतकरी वीज, इंधन गावातच तयार करू शकतो. धानाची तणीस, गवांडा आणि तुराट्यांपासून इथेनॉलची निर्मिती शक्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यापासून सुमारे दीडशे लिटर इथेनॉल तयार होते. पेट्रोल अवघ्या ३५ रुपयात मिळण्यास मदत होऊ शकते, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.

 

पूर्ती उद्योग समूहानं शेतकऱ्यांसाठी सोलर पंपाचीही निर्मिती केलीय. भारनियमनामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत होईल, अशा पद्धतीनं सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शेताला पाणी देता येऊ शकेल, असा सौरपंप तयार करण्यात आला आहे. त्याती किंमत ५ लाख रुपये आहे. मात्र, पूर्ती उद्योग समुहातर्फे शेतकऱ्यांना यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या समृ्ध्दीसाठी नितीन गडकरी यांची ही योजना यशस्वी ठरली तर ३५ रुपयांत पेट्रोल आणि मोफत वीज शेतकऱ्यांना मिळेल. एकूणच आत्महत्याग्रस्त विदर्भाला आशेचा नवा किरण मिळणार आहे. शेतीबाबत इतर राजकीय नेत्यांनीही सकारात्मक दृष्टीकोण ठेवून गडकरींच्या कार्याचा आदर्श घेतला तर इस्त्रायलच्या दिशेने वाटचाल करणं सोयीचं होईल.

 

.