अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर
कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या औषध एजन्सीचा नागपुरात पर्दाफाश झालाय. एवढंच नाहीतर या बनावट औषधांमुळं काहींवर किडनी खराब होण्याची वेळ आली आहे.
दुर्धर आजार बरे करून देतो असं सांगून अनेकांची लुबाडणूक करणाचा एक धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आलाय. नागपूरच्या गणेशपेठ भागात श्रीनाथ एंजन्सीच्या नावानं औषध विक्री सुरू होती. सर्वच व्याधींवर आयुर्वेद औषधांचा दावा एक औषध विक्रेता करत होता. लोकांच्या जिवाशी खेळ करण्यासोबतच हा विक्रेता अगदी कमी किमतीत मिळणा-या आयुर्वेदिक औषधांकरिता रुग्णांकडून लाखो रुपये उकळत होता. त्याच्या या औषधामुळे काहींवर किडनी खराब होण्याची वेळ आली आहे.असा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मनसेनं राडा करत आपला निषेध नोंदवलाय.
मनसे कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनानं संबंधित औषधांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.मात्र अजुनही ह्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ करणा-या श्रीनाथ एजन्सीच्या मालकाला तत्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होतेय.