www.24taas.com, वर्धा
वर्धा जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमध्ये सुविधांची वाणवा आहे. जंगलानं वेढलेल्या परिसरात, प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. इतकंच, नव्हे तर पाण्यासाठी रोज सात किलोमीटरची पायपीट करावी लागतेय.
वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधील बोर अभयारण्यातील आदिवासी मुलांची आश्रमशाळा... शाळेचा आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे जंगलानं वेढलेला... वाघ, बिबटे, साप, अस्वलासारख्या प्राण्यांचा इथं असतो मुक्तपणे वावर... भिंतींना भेगा पडलेली घरं... आश्रमशाळेपासून १३ किलोमीटर दूर प्राथमिक सेवेची उपाययोजना... स्वच्छतागृहांचा अभाव... पिण्याच्या पाण्याची सोय आहे तर वीजेअभावी नळाला पाणीच नाही... पाण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागतेय सात किलोमीटर दूर पायपीट... अशा वातावरणात या परिसरातील मुलं शिक्षण घेत आहेत.
पाण्याच्या सोयीअभावी आश्रमशाळेच्या भिंतीचं बांधकाम चार कोटी मंजूर होऊनही रखडलंय. पाण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली मात्र तीही जागोजागी फुटलीए. आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच इथल्या शिक्षकांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे ही शाळा दुसरीकडे नेण्याची मागणी होतेय. अशा घनदाट जंगलात आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलांचे आणि शिक्षकांचे जीवन धोक्यात असताना सरकार मात्र काही लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे असं जंगली जीवन किती दिवस जगायचं असा सवाल विचारण्यात येतोय.
.