'थंड' माथेरान नामांतराच्या वादामुळे झालं 'गरम'

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणा-या माथेरानमध्ये सध्या नामांतराचा प्रश्न जोरात गाजतोय. रेल्वे स्थानकाला आदमजी पीर भॉय यांचे नाव देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून कोणत्याही परिस्थितीत माथेरान हे नाव बदलू नये यासाठी माथेरानकर पुढं सरसावलेत.

Updated: Jul 9, 2012, 08:35 AM IST

अमोल पाटील, www.24taas.com, माथेरान

 

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणा-या माथेरानमध्ये सध्या नामांतराचा प्रश्न जोरात गाजतोय. रेल्वे स्थानकाला आदमजी पीर भॉय यांचे नाव देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून कोणत्याही परिस्थितीत माथेरान हे नाव बदलू नये यासाठी माथेरानकर पुढं सरसावलेत. त्यामुळं एरवी थंड असणारं माथेरान या वादावरून गरम होत चाललंय.

 

सर आदमजी पीर भॉय यांनी मोठ्या जिद्दीनं आपले सर्वस्व पणाला लावून आणि स्वत;चे पैसे खर्चून माथेरानला रेल्वे आणली. एका भारतीयानं हे शिवधनुष्य पेलून ब्रिटिशांकडं पाठपुरावा करुन भविष्याच्या दृष्टीनं माथेरानला रेल्वे  आणणा-याचे नाव रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांची आहे. परंतु शासनदरबारी दखल न घेतल्यानं आदमजी पीर भॉय यांच्या पणतूनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

 

डोक्यावरचे रान म्हणून त्यावेळी निसर्गाला साजेसे असे माथेरान नाव ठेवण्यात आल्यानं आणि रेल्वे स्थानकाची ओळख हिच माथेरानची ओळख असल्यानं नागरिकांना नामांतरला विरोध केलाय. माथेरानमध्ये यासंदर्भात पोस्टर लावून अनोख्या पद्धतीनं जागृती मोहिमही राबवण्यात येतंय.

 

स्थानकाच्या नामांतरावरून सुरु असलेला हा वाद भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता हे प्रकरण न्यायालयात असल्यानं न्यायालयाच्या निर्णयाकडं माथेरानकरांचे लक्ष लागलं असले तरी शासनानं यात हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी अपेक्षा यानिमित्ताने पुढे येत आहे.