'करिअर बनाऊंगा'च्या नावाखाली 'बनवाबनवी'

टिव्हीवर चमकण्य़ांची साऱ्यांनाच आवड असते मात्र याच मोहाला बळी पडून सर्वस्व गमावून बसतात. टिव्हीवर सुरु असलेल्या सिरीयलमध्ये काम मिळवून देतो असं सांगून लोकांना फसवणारा एक ठकसेन पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

Updated: Nov 4, 2011, 11:10 AM IST

झी 24 तास वेब टीम, कळवा

 

टिव्हीवर  चमकण्य़ांची साऱ्यांनाच आवड असते मात्र याच मोहाला बळी पडून सर्वस्व गमावून बसतात. टिव्हीवर सुरु असलेल्या सिरीयलमध्ये काम मिळवून देतो असं सांगून लोकांना फसवणारा एक ठकसेन पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कळवा पोलिसांनी त्याला अटक केली. सिरीयलमध्ये काम देण्याच्या बहाण्यानं किरण या युवकानं आतापर्यंत अनेकांना लाखोंचा गंडा घातला.

 

लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांना सिरीयल पाहण्याचंच वेड असतं असं नाही तर या सिरियलच्या माध्यमातून पडद्यावर झळकण्याचं स्वप्नही अनेकजण पहात असतात. याचाच फायदा घेत समाजात अनेक ठकसेनही वावरत असतात. असाच एक ठकसेन कळवा पोलिसांच्या जाळ्यात आला. किरण उर्फ बंटी महाडिक यानं डोंबिवलीत राहणाऱ्या सुहास धुरी यांना असंच आमिष दाखवलं मात्र सुहास यांना संशय येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी किरणवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

 

विशेष म्हणजे याआधीही किरण अशाच काही गुन्ह्यांखाली तुरुंगात गेला होता आणि जामिनावर सुटला होता. किरणला जरी आता पोलिसांनी अटक केली असली तरी किरणसारख्या प्रवृत्ती समाजात राजरोसपणे फिरत असतात, त्यांच्या पासून सावध राहण्याची नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे.