www.24taas.com, ठाणे
दहिसर ऑक्ट्रॉय नाक्यावर बनावट पावत्या दाखवून वाहनं मुंबईत नेणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून ५४ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे.
संजीव मिश्रा, गोरखनाथ पवार, उमेश नायर, दीपक शहा, शरद चौरे आणि महेश सुवर्णा अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. यापैकी गोरखनाथ पवार हा मुख्य आरोपी त्याच्या गाडीवर कधी ‘प्रेस’ तर कधी ‘व्हीआयपी’ किंवा राजकीय पक्षांच्या बॅनरचे स्टिकर लावून ऑक्ट्रॉय न भरता वाहन मुंबईत न्यायचा. इतकंच नाही तर गोरखनाथ हा जकात नाक्यावर क्लिअरिंग एजंट म्हणून कामाला असून त्यानं पालिकेच्या बनावट पावत्याही बनवल्या होत्या. ज्या कंपनीच्या गाड्या जकात भरण्यासाठी यायच्या त्यांना या बनावट पावत्या देऊन त्यांच्याकडून डीडी किंवा रोख रक्कम स्वीकारायचा.
अटक करण्यात आलेल्या आऱोपींकडून बनावट ऑक्ट्रॉय, टॅक्स पावती, बनावट रबर स्टँप, पालिकेचं लेटरहेड व्हिजिटिंग कार्ड, लाल दिवा असा ५४ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तर या घोटाळ्यात मुंबई महापालिकेचे काही कर्मचारीही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.