www.24taas.com, कल्याण
एक ऐतिहासिक शहर म्हणून कल्याण शहराची ओळख आहे. या शहराच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींवर आधारीत ‘आठवण भाग एक’ ही डॉक्युमेंट्री प्रकाशित करण्यात आली. लेखक-दिग्दर्शक समीर लिमये यांनी ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे. या डॉक्युमेंट्रीत कल्याण शहरासाठी भरीव योगदान देणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
आजच्या कल्याण शहराच्या जडण-घडणीत बापूसाहेब ओक, भाऊराव पटवर्धन, विनायक पटवर्धन, भास्कर गोडसे आणि गंगाधरपंत जोशी अशा अनेक लोकांनी योगदान दिलं आहे. या सन्माननीय व्यक्तींच्या कार्याचा गौरव म्हणून ‘आठवण’ ही डॉक्युमेंट्री बनवण्यात आल्याचं दिग्दर्शक समीर लिमये यांनी म्हटलं आहे. शिल्पकार स. द साठे अणि डॉक्टर सच्छिदानंद शेवडे यांच्या हस्ते ही डॉक्युमेंट्री प्रकाशित करण्यात आली.
जुनं कल्याण आणि नवीन कल्याण यांचा सुरेख मेळ या डॉक्युमेंट्रीत आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक ‘कल्याणकरानं’ आपल्या संग्रही ठेवावी, अशी ही डॉक्य़ुमेंट्री आहे. ज्यांनी कल्याण शहराला समृद्ध केलं त्यांना दिलेलं हे मानाचं पानं निश्चितच स्तुत्य आहे.