लोकसभेत महागाईवरून हंगामा

लोकसभा आणि राज्यसभेत महागाई आणि तेलंगणा राज्याच्या मुद्यावरून गोंधळ निर्माण झाला.

Updated: Nov 24, 2011, 10:13 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

लोकसभा आणि राज्यसभेत महागाई आणि तेलंगणा राज्याच्या मुद्यावरून गोंधळ निर्माण झाला. या हंगामानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दोनदा  स्थगित करण्यात आलं. दोन्ही सभागृहात महागाईवरून हंगामा झाल्याने कामकाज होऊ शकले नाही.

 

पहिल्यांदा १२ वाजेपर्यंत तर दुसऱयांदा २ वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होत. लोकसभा सुरू होताच तेलंगण निर्मितीचे विधेयक लोकसभेत आणले जावे, या मागणीसाठी तेलंगण राष्ट्र समिती, तेलगू देसमच्या खासदारांनी अध्यक्षा मीराकुमार यांच्यापुढील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी केली. पाठोपाठ कॉंग्रेसच्या तेलंगण समर्थक खासदारांनीही हातात फलक घेऊन घोषणा द्यायला सुरवात केली.

 

दुसरीकडे, महागाईवर मतविभाजन प्रस्तावांतर्गतच चर्चेच्या मागणीसाठी आग्रही असलेले मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार घोषणा देत पुढे सरसावले. मल्लपेरियार धरणाच्या मुद्द्यावर द्रमुकच्या खासदारांनी स्थानिक वृत्तपत्राच्या प्रती झळकावत गोंधळ घालायला सुरवात केली. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार समीर भुजबळ, संजीव नाईक या खासदारांनी कांद्याचे किमान निर्यातमूल्य रद्द करावे, अशा मागणीचे फलक झळकावून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

संसदेत विरोधी पक्षांकडून घातला जाणारा गोंधळ नवा नाही; परंतु आजच्या गोंधळात सत्ताधारी कॉंग्रेसच्या तेलंगण समर्थक खासदारांनी, तसेच द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी कॉंग्रेस या घटकपक्षांनी सहभाग नोंदवून सरकारची कोंडी केली.