www.24taas.com, पाटणा
बिहारमध्ये मुख्यंमत्री असताना कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लालूप्रसाद यादव यांच्यासह ३३ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आता लालूप्रसादांचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
लालूचे सहकारी जगन्नाथ मिश्रा, जनता दलाचे खासदार जगदीश शर्मा यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे खासदार आर. के. राणा यांच्यावरही सीबीआयचे न्या. व्ही. के. श्रीवास्तव यांनी आरोप निश्चित केले आले आहेत. चारा घोटाळाप्रकरणी आतापर्यंत ३३० जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत.
लालूप्रसाद मुख्यमंत्रीपदावर असताना १९९४ के १९९६ या काळात आरोपींनी बांका आणि भागलपूर कोषागारातून अवैधपणे ४६ लाख रुपये काढले होते. प्राण्यांसाठी चारा आणि त्याची वाहतूक करण्याच्या नावाखाली बनावट देयके तयार करून रक्कम हडप केली होती. त्याप्रकरणी लालू आणि मिश्रा यांना आरोपी करण्यात आले होते.
लालूप्रसाद यांच्याविरुद्ध दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने १८ डिसेंबर २००७ मध्ये दोघांनाही दोषमुक्त ठरविले होते. मात्र, या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याविरुद्ध अर्ज न केल्याने सरकारनेच पुढाकार घेऊन लालूंना पुन्हा न्यायालयात खेचले होते.