रेल्वे भाडेवाढ कमी होणार?

ममता बॅनर्जींच्या दबावाला बळी पडून दिनेश त्रिवेदी यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ज्या भाडेवाढीबाबत ममतांनी राजीनामा घेतला ती भाडेवाढ मागे घेण्यासाठी ममता बॅनर्जींनी सरकारवर दबाव वाढवला आहे.

Updated: Mar 19, 2012, 11:31 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

ममता बॅनर्जींच्या दबावाला बळी पडून दिनेश त्रिवेदी यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ज्या भाडेवाढीबाबत ममतांनी राजीनामा घेतला ती भाडेवाढ मागे घेण्यासाठी ममता बॅनर्जींनी सरकारवर दबाव वाढवला आहे. त्यामुळं सरकारवर भाडेवाढ मागे घेण्याची नामुष्की ओढवण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

 

ममतांच्या मागणीनुसार सरकार स्लीपर कोचची भाडेवाढ मागे घेण्याची शक्यता आहे. तर दिनेश त्रिवेदी यांनी राजीनामा दिल्यानं रेल्वे अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी संसदेच्या पटलावर कोण ठेवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ममतांनी आज दिल्लीत टीएमसीच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत रेल्वेमंत्रिपदी मुकुल रॉय यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

याआधी ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याची मागणी लेखी केली तरच राजीनामा देऊन अशी भूमिका त्रिवेदी यांनी घेतली होती. त्यानंतर ममतांनी केंद्र सरकारला २४ तासांचं अल्टिमेटमही दिलं होतं. २४ तासात त्रिवेदींचा राजीनामा घेतला नाही तर केंद्र सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करण्याचा इशारा ममतांनी दिला होता. त्यामुळे सरकारची चांगलीच गोची झाली होती.