रेल्वेची भाडेवाढः ममता नाराज, त्रिवेदी जाणार?

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अर्थसंकल्पात अत्यल्प भाडेवाढ केली असली तरी त्यामुळे त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींची नाराजी ओढावून घेतली आहे.

Updated: Mar 14, 2012, 03:48 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अर्थसंकल्पात अत्यल्प भाडेवाढ केली असली तरी त्यामुळे त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींची नाराजी ओढावून घेतली आहे.

 

 

अर्थसंकल्प तयार करताना पक्षाला विश्वासात न घेता भाडेवाढ केल्यामुळे ममता बॅनर्जी नाराज झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने अर्थसंकल्पावर टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या या भूमिकेमुळे रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

तृणमूल काँग्रेसने भाडेवाढ मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तर रेल्वे अर्थसंकल्पातील भाडेवाढ हा सर्वस्वी माझा निर्णय होता, असे रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी स्पष्ट केले आहे.  ममता बॅनर्जींना दोष देऊ नका असंही त्रिवेदी म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. तृणमूलने रेल्वे अर्थसंकल्पाला जाहीर पाठिंबा देण्यास  स्पष्टपणे नकार दिला आहे.

 

 

ममता बॅनर्जींना भाडेवाढ करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली नव्हती असे त्रिवेदी  स्पष्ट केले. यामुळे कदाचित दिनेश त्रिवेदींवर दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येईल, अशीही शक्यता आहे. रेल्वे अर्थसंकल्पातील भाडेवाढ करण्याच्या तरतुदीमुळे तृणमूल काँग्रेस पक्षात फूट पडली आहे.

 

 

तृणमुल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी देखील ट्विटरवर सेकंड क्लासच्या भाड्यात वाढ केल्या बद्दल मतभेद दर्शवले आहेत.  भाडेवाढ करण्या संदर्भात पक्षाला अंधारात ठेवल्यामुळे दिनेश त्रिवेदींचा हा पहिला आणि अखेरचा अर्थसंकल्प ठरण्याची शक्यता आहे.