रामदेवांवरील पोलीस कारवाईचा आज फैसला

योग गुरू बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ४ जूनच्या मध्यरात्री केलेल्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 23, 2012, 01:38 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

योग गुरू बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ४ जूनच्या मध्यरात्री केलेल्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे.

 

पोलिसांनी कारवाईच्या वेळेस बाबा रामदेवांच्या भक्तांवर केलेल्या बळाच्या गैरवापरा संदर्भात माध्यमांनी दिलेल्या बातम्यांची दखल स्वताहून सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती.

 

पोलिसांनी अत्यंत अमानुष पध्दतीने बळाचा वापर करत आंदोलन मोडून काढलं होतं. मध्यरात्री केलेल्या कावाईच्या वेळेस महिला आणि मुलांचा विचारही पोलिस दलाने केला नाही. पोलिसांच्या कारवाई दरम्याने जखमी झालेल्या एका महिलेचा नंतर मृत्यू झाला. न्यायमूर्ती बी.एस.चौहान आणि स्वतंत्र कुमार यांनी यासंदर्भातला निर्णय २० जानेवारी रोजी राखून ठेवला होता.

 

सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला. तसंच मध्यरात्री बळाचा वापर करणाऱ्या सर्वांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी बाबा रामदेवांनी केली.

 

देशाबाहेर दडवलेला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात रामदेवांनी आंदोलन छेडलं होतं आणि परदेशातील गुप्त बँक खात्यांमध्ये असलेली संपत्ती परत देशात आणण्यात यावी अशी मागणी केली होती. दिल्ली पोलिसांनी मात्र रामदेव यांनी आपल्या भक्तांना हिंसाचार करण्याची चिथावणी दिल्याने मध्यरात्री कारवाई करणं भाग पडल्याचा दावा केला आहे.