www.24taas.com, बंगळुरू
रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी तिकडे कर्नाटकात राज्य सरकारनंच पुढाकार घेऊन पूजाअर्चा सुरु केलीय. राज्यातल्या ३४ हजार मंदिरांत होमहवन करण्यासाठी सरकारनं तब्बल १७ कोटी रुपये वाटलेत. आता पूजापाठ करून इंद्रदेव प्रसन्न होणार का? हा नवाच प्रश्न या निमित्तानं पुढे आलाय.
मान्सूनअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानं कर्नाटक सरकारनं आता मंदिरात पूजापाठ करण्याच्या नावाखाली १७ कोटी रुपये ‘स्वाहा’ करायला सुरुवात केलीय. रुसलेल्या मान्सूनला प्रसन्न करण्यासाठी हा सगळा आटापिटा आहे. राज्यात छोटी-मोठी ३४ हजार मंदिरं आहेत, त्यांना हवन करण्यासाठी पाच-पाच हजार रुपये दिले गेलेत. ‘यावेळी मान्सूनची चिंता सर्वांनाच आहे. आम्हाला शेतक-यांना सर्व त-हेची मदत करायची आहे. त्यामुळे आम्ही राज्यातल्या मंदिरात पूजा करण्याचा निर्णय घेतलाय’ असं स्पष्टीकरणं इथल्या पुजा-यांनी दिलंय.
पण, सरकारी पैशानं पूजापाठ करण्याच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केलीय. ‘सरकारी तिजोरीतून असे करोडो रुपये खर्च करून पूजापाठ करण्यात काय अर्थ आहे? हाच पैसा शेतक-यांना दिला असता तर अधिक बरं झालं असतं’, असं विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी म्हटलंय.
तिकडे राज्य सरकारनं शेतक-यांचं २५ हजार रुपयांपर्यंतचं कर्ज व्याजासहीत माफ केलंय. दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडेही दोन हजार कोटींचं पॅकेज मागितलंय. अर्थात मंदिरांत पूजा करून इंद्रदेव प्रसन्न होतील, हा कर्नाटक सरकारचा विश्वास बुद्धीवाद्यांसाठी मात्र अनाकलनीय ठरलाय.
.