www.24taas.com, लखनऊ
जंगलातून फिरायचंय तेही रात्री... ही संधी आता भारतातही उपलब्ध होणार आहे. कुठे माहित आहे... उत्तरप्रदेशात. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांनी ही संकल्पना अस्तित्त्वात आणण्यासाठी तसे प्रयत्न सुरु केले.
उत्तरप्रदेशमध्ये वन पर्यटनाला चालना देण्यासाठी तसंच खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारनं हा उपाय काढलाय. यासाठी दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा आणि राजधानी लखनऊमध्ये ‘नाइट सफारी’च्या संकल्पनेला मूर्त रुप देण्याचं त्यांनी ठरवलंय.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत ‘नाइट सफारी’साठी टेंडर्स मागवण्याच्या मुद्यावर एकमत झालं. यासाठी एका समितीची नेमणूकही करण्यात आलीय. अधिका-यांनीही या बातमीला दुजोरा देत, ‘जंगली प्राणी रात्रीही जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करुन देणारी ही भारतातील पहिली नाइट सफारी असेल’ असा दावा केलाय. सध्या आशिया खंडात फक्त सिंगापूरच्या अभयारण्यात अशी सुविधा उपलब्ध आहे.
‘प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप’द्वारे स्थापन करण्यात येणा-या या नाइट सफारीसाठी जमीन मात्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच, योजनेसाठी लागणा-या भांडवलाची जबाबदारी निविदा प्रक्रियेत निवड केल्या जाणा-या विकासकाची असेल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
.